- ऋषी श्रीकांत देसाई
आज सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळच्या पडवे लाईफटाईम मेडिकल कॉलेजचा शुभारंभ होतोय. स्वप्न, ध्यास, आणि पूर्ती या तीन शब्दातला हा प्रवास आहे. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांचा हा लोकार्पण सोहळा आहे.
आज या निमित्ताने अनेक दिग्गज लिहिते झालेत. जवळ जवळ सगळी चॅनल याचे कव्हरेज करतायत. पण त्याही पेक्षा साधारणपणे सत्तर एकरवर पसरलेला हा भव्य प्रकल्प अजूनही आपल्यापर्यंत अजूनही समजलेलाच नाही याच्यासाठी ही सुश्रुतदुर्गाची गोष्ट मांडतोय!
शिक्षण या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिद्द काय असते ही दहावी बारावी बोर्ड स्थापन झाल्यावर गुणवत्ता यादीत आम्ही दाखवून दिलय. ऑन तरीही साधारणपणे मागची तीस वर्षे मालवण पॉलिटेक्निक, सावंतवाडी आयुर्वेद कॉलेज यांच्यातच आम्हाला गुणवत्ता सांगता येत नव्हती. शिक्षणासाठी पुणे मुंबई कोल्हापूर गाठताना दहावी ते लग्न हा पाल्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा पालकांच्या आणि त्या घराच्या नात्यातून फार फार दूर व्हायचा. पडवे मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आज एका दिवसात बदलतील हा दावा नाही. पण या निमित्ताने स्वप्नांचे क्षितीज आता नजरेत आलंय. ही बदलाची सुरुवात आहे, आणखीही बदल होतील..
मेडिकल कॉलेज म्हणून पाहताना आज सगळी माध्यम 'खासदार नारायण राणेंना' नेता म्हणून मांडतील, पण त्या पल्याड जाऊन 'दादा' आणि 'पालकत्वाचा विचार' आज समजून घेतला पाहिजे.
ही गोष्टच 1990 नंतर बदललेल्या वाटेची आणि स्वप्न जगताही येतात या एका सिद्धांतावरची आहे. हे जे राणे यांचे प्रवाहीपण आहे ते समजून घ्यावे लागेल. 90 च्या दशकात गरजूना वह्या पुस्तक वाटणे इथपासून शाळा उभारणी , 2000 च्या दशकात गुणवंताना लॅपटॉप देणे असो की नवे प्रवाह तरुणाईला देणे असो , 2010 च्या दशकात नव्या शैक्षणिक संकल्पातून हा सगळा विचार ओवणे असून आणि आता पुढच्या दशकात मेडिकल कॉलेजची उभारणी असो.. हे सगळ समजून घेतलं ना की तुम्ही तुमच्या मनात राजकारण हा शब्द किती छोटा करून घेतलाय हे उलगडत जाते. गंमत म्हणजे हे सगळ लिहिताना पहिल्या या सगळ्या दशकांचा आपण एक साक्षीदार आहोत आणि याच विचारांच्या समृद्धीतून आज लिहिते झालो आहोत हे आज जाणवतय !
आपल्याला प्रत्येकाला पडवेच्या मेडिकल कॉलेजचा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय एवढंच ठाऊक आहे, पण त्या सगळ्याचा शैक्षणिक दृष्ट्या भव्यपणा अजूनही कुठे ना छापून आलाय ना कुणाच्या लाईव्ह कव्हरेज मध्ये टीपला गेलाय. थोडक्यात जरी समजून घेतला ना तरी आजपासून या सगळयांचे वेगळेपण आपल्याला समजत जाईल !
पडवे लाईफटाईम मेडिकल कॉलेज हा सत्तर एकर क्षेत्रात पसरलेला नव्या धन्वंतरीचा संस्कारक्षम असा विद्याहोत्र प्रांगण आहे. साधारणपणे दीडशे किलोमीटर उत्तरेला आणि दीडशे किलोमीटर दक्षिणेकडे एकही मेडिकल कॉलेज नसलेल्या स्पेसमध्ये सुरु होणाऱ्या या मेडिकल कॉलेजचे नेमकं महत्व आज महाराष्ट्रातील मेडिकल क्षेत्रात करियर करणाऱ्या नव्या पिढीला उमगलंय. यातली नोंद करायची गोष्ट ही आहे की 150 विद्यार्थी क्षमता असणाऱ्या या कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी यंदा पहिल्या वर्षीच 400 पेक्षा जास्त विद्यार्थी इच्छुक होते. साडेचार वर्ष शिक्षण आणि एक वर्ष इंटरशीप याचा जरी विचार केला तरी साधारणपणे दरवर्षी नव्या डॉक्टरांची संख्या आपल्या लक्षात येईल !
मेडिकल शिक्षण हे पहिल्या वर्षात बायोकेमिस्ट्री, एनोटॉमी आणि फिजिओलॉजी या तीन विषयांच्या कक्षेत फिरते. तीन विषय आणि साधारण दीडशे विद्यार्थी जरी गृहीत धरले तरी याचा टिचिंग स्टाफ किती असेल एक अंदाज बांधा ? दीडशे विद्यार्थ्यांना तीन विषय म्हणजे जास्तीत जास्त नऊ शिक्षक हा जर तुमचा अंदाज असेल तर तो गैरसमज आहे. आज कॉलेज सुरु होण्या पूर्वी 128 शिक्षक कार्यरत आहेत. नॉन टिचिंग स्टाफचा आकडा वेगळाच आहे !
या कॉलेजचे एनोटॉमी म्युझियम ही बाब खूप वेगळी आहे. मुन्नाभाई एमबीबीएस सारखे 'अपने लिए पर्सनल बॉडी' हा विषय फक्त विनोदाचा नव्हता, वैद्यक शिक्षणाच्या मर्यादा सांगणारा होता. शाळेतल्या एका कपाटात ठेवलेला प्लास्टर ऑफ पॅरिसचा सांगाडा आणि त्याला मानवी देह म्हणून आठवीला जीवशास्त्राचा अभ्यास करणारा एक मुलगा म्हणून ते आठवताना हे म्युझियम "हाऊ लॉंग, हाऊ लॉंग" चा प्रवास सांगेल म्हणा !!
आज ऑनलाईनच्या शिक्षण प्रवाहात प्रत्यक्ष शिक्षणाला दृकश्राव्य शिक्षणाची जोड मिळालीय म्हणा. पण पडवे कॉलेजमध्ये असलेली इ लर्निंग लायब्ररी हे याच गोष्टीचे काळाच्या पुढच्या पावलांचे रूप आहे. तब्बल पाच हजारपेक्षा जास्त ग्रंथ आणि इ लर्निंगची जोड असणारी स्वतंत्र वातानुकूलित लायब्ररी शिक्षणाला संपन्न बनवेल !
शिकण्याला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली तरच त्या शिकण्याचा प्रवास अनुभवसिद्ध होतो. सुसज्ज कोविड मोलक्युअर लॅबच्या वर्तमानापासून हे अनुभवसंपन्नपण जाणून घ्या. 12 मॉडेल्युअर लॅब, 1.5 टेस्ला केपीसिटी एमआरटी मशीन, 16 स्लाइस सिटी स्कॅन मशीन, लिथ्रोटिपसी मशीन, मॅमोग्राफी हायएन्ड मशीन, पीडिएट्रिक इंफ्रंट मशीन, सेंट्रल क्लिनिकल लॅबोरेटरी, ब्लड बँक या सगळ्या गोष्टी या नव्या डॉक्टरांना शिकताना 'पर्सनल सब्जेकट आणि ऑब्जेक्ट' डॉक्टर नाही थेट डीन बनवतील !
या कॉलेजबद्दल लिहिण्यासारखे प्रचंड आहे, पण हा जाहिरात पूरवणीचा लेख नाहीय. हा एक विद्यार्थी म्हणून तत्कालीन मर्यादा पाहत मोठा झालेल्या या जिल्ह्यातील शिक्षण प्रवाहाचा नवा उंबरठा म्हणून मनापासून मांडतोय. मी आज कितीही प्रयत्न केला तरी वाळूचे घड्याळ उलटे करुन पुन्हा शाळकरी आणि महाविद्यालयीन आयुष्य नाही जगू शकत.. पण आयुष्यभर या मातीत शिकलेला एक विद्यार्थी आहे.
आपल्याकडे जी मेडिकलची परंपरा आहे ती आरोग्य शास्त्र म्हणून समजून घेताना 'धन्वंतरी', चरक आणि सुश्रुत यांच्या देवत्वपणातूनच पाहावी लागेल. आजही जगभरात डॉक्टर शब्द उच्चारला की मानवता हा शब्द आठवतो. आणि मानवता या शब्दाचे सर्वोच्च शिखर म्हणजे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस ! याच मातीला कोटणीस यांच्या वारश्याची जी परंपरा आहे. त्याच होत्रात ही नवी समिधा पडतेय.. याच होत्रातून आभाळ व्यापणारी एक पिढी घडो ! माझा सिंधुदुर्ग भविष्यात वैद्यकशास्त्र परमोधर्म जपणारा लाखो सुश्रुतांचा अभेद्य दुर्ग बनो याच शब्दशः 'हृदयापासून' शुभेच्छा !
Tags:
thoughts
